नांदेडमध्ये १ हजार १४६ पूरग्रस्तांचे स्थलांतर, महापालिका आयुक्तांनी दिल्या ‘त्या’ भागांना भेटी

नांदेड येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या मदतीला महापालिका प्रशासन धावून जात असून मागील दोन दिवसांपासून मदतकार्य करीत आहे.
नांदेडमध्ये १ हजार १४६ पूरग्रस्तांचे स्थलांतर, महापालिका आयुक्तांनी दिल्या ‘त्या’ भागांना भेटी
ANI
Published on

नांदेड : नांदेड येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या मदतीला महापालिका प्रशासन धावून जात असून मागील दोन दिवसांपासून मदतकार्य करीत आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी मंगळवारी शहरातील सखल भागातील विविध पूरग्रस्त भागांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी आयुक्तांनी शहरातील नदीपात्रालगत व सखल भागात पाणी शिरल्याने महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा निचरा करण्याची प्रक्रिया व नागरिकांच्या स्थलांतरीत प्रक्रियेची पाहणी केली. याचबरोबर आयुक्तांनी महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारण केंद्रास भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. मागील दोन दिवसांत महापालिका प्रशासनामार्फत एकूण १ हजार १४६ नागरिकांना स्थलांतरीत करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे जेवण, पिण्याचे पाणी आदी जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात येत असून, या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, औषध फवारणी, प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचाच आढावा आयुक्तांनी प्रत्यक्ष निवारा केंद्रास भेट देऊन घेतला आहे.

नांदेड महापालिकेमार्फत आवाहन

या दरम्यान मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे बोटीचा वापर करून पूरस्थितीत अडकलेल्या खडकपुरा (समीराबाग) भागातील ३२ नागरिकांना, लिंगायत स्माशानभूमीजवळील उर्वशी मंदिराजवळ ५ नागरिकांना तर गायत्री मंदिर पांडे गल्ली भागातून १६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. या भेटीदरम्यान पूरग्रस्त भागातील नागरिकांची विचारपूस करून महापालिका प्रशासन आपणास हवी ती मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन देऊन मनपा आयुक्तांनी नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी शहरात उदभवलेल्या पूरजन्य परिस्थितीत घाबरून न जाता मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती शाखेला किंवा जवळच्या क्षेत्रिय कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in