शरीराची चाळणी झाली तरी मागे हटणार नाही- मनोज जरांगे, शांतता रॅलीनिमित्त जाहीर सभेत मराठा बांधवांना आश्वासन

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये सोमवारी (दि.८) राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी शांतता रॅली काढली होती.
शरीराची चाळणी झाली तरी मागे हटणार नाही- मनोज जरांगे, शांतता रॅलीनिमित्त जाहीर सभेत मराठा बांधवांना आश्वासन

प्रतिनिधी/नांदेड

माझ्या शरीराची चाळणी झाली. सरकारने माझ्यावर हल्ले केले. एसआयटी स्थापन केली. मी भिणाऱ्यापैकी नाही. मराठा समाज माझ्याकडे आशेने बघत आहे. त्यामुळे मी मॅनेज होणार नाही. मी फुटणारही नाही. माझी एकच इच्छा आहे, ती म्हणजे मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळावे, असे मत मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये सोमवारी (दि.८) राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी शांतता रॅली काढली होती. त्यानिमित्त आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी आमच्या मायबापांनी रान विकले. पण आमचे शिक्षण पूर्ण केले. ओबीसी मधून आरक्षण घेणारच. हा अधिकारीवर्ग गोरगरीब मराठ्यांना त्रास देतात. नांदेडवासिय मला साथ द्या, अशी भावनिक साथही मनोज जरांगे यांनी घातली.

छगन भुजबळ मला वेडा बोलतो. मला काही तुझ्यासोबत लग्न करायचे आहे का, असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला. ५४ लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. एका नोंदीवर तीन प्रमाणपत्र निघतात. भुजबळ यांना तुम्ही माझ्यावर सोडलात. मला काहीही फरक पडणार नाही, असा टोलाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जो नरेटिव्ह तुम्ही माझ्याविरुद्ध निर्माण केलात, तो मी भरून काढला. आम्ही तुम्हाला विरोधक कधीच मानले नाही.

- मनोज जरांगे पाटील, मराठा योद्धा

तुम्ही जातीसाठी कट्टर आहात. मी माझ्या जातीसाठी कट्टर आहे. आमच्या सरकारी नोंदी सापडल्या असून, त्या वाया जाता कामा नये. मी समाजाला न्याय देणार आहे. अपेक्षाभंग होऊ देणार नाही. मी माझे आयुष्य समाजासाठी अर्पण केले आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.

छगन भुजबळ यांना थांबवा

छगन भुजबळ यांना हाताशी धरून ओबीसी समाजाला आपल्याजवळ केलात. अम्ही तुम्हाला विरोधक कधीच मानत नाही. आमचे आरक्षण द्या, सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्या, मराठे कुणाला सुधरु देत नाहीत. मी फुटत नाही. मॅनेज होत नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

आरक्षण द्या, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल

फडणवीस तुम्ही अख्ख भाजप गमावून बसला आहात. मराठ्यांना त्रास दिला तर बघा. खुर्चीजीवी- सत्ताजीवी यांना सोडणार नाही. मराठ्यांशी दगाफटका करू नका. आरक्षण द्या. मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. नाहीतर पुन्हा मुंबईकडे मराठा समाज येईल. यावेळी त्यांनी उपस्थित मराठा बांधवांना विचारले, की १३ जुलैनंतर काय करायचे....तर एकच जल्लोष झाला मुंबई... मुंबई.

logo
marathi.freepressjournal.in