नऊ जागांवरून रस्सीखेच; महायुतीतील जागावाटपाचा गोंधळ मिटेना

मुंबईत लोकसभेच्या एकूण ६ जागा असून, महायुतीत भाजप ३ आणि शिंदे गट शिवसेना ३ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मुंबईतील तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम आणि मुंबई उत्तर-मध्य या जागांवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
नऊ जागांवरून रस्सीखेच; महायुतीतील जागावाटपाचा गोंधळ मिटेना
संग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर करून आघाडी घेतली असताना महायुतीत मात्र अजूनही ९ जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागांवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप जागावाटप अंतिम टप्प्यात आलेले नाही. या ९ जागांमध्ये मुंबईतील तीन जागांसह नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांचा समावेश आहे.

मुंबईत लोकसभेच्या एकूण ६ जागा असून, महायुतीत भाजप ३ आणि शिंदे गट शिवसेना ३ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मुंबईतील तीन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम आणि मुंबई उत्तर-मध्य या जागांवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. दक्षिण मुंबईवर भाजपसह शिंदे गटाने दावा केलेला आहे. भाजप येथून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मैदानात उतरविण्याच्या विचारात आहे. मात्र, ही जागा शिवसेनेची असल्याने शिंदे गटाचा या जागेवर दावा आहे. यासोबतच मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत. मात्र, या जागेवर ठाकरे गटाने कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे शिंदे गट गजानन कीर्तीकर यांच्याऐवजी पर्यायी उमेदवार देण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु, त्यांच्या नावाला भाजपने विरोध केला आहे. यासोबतच मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजप पर्याय शोधत आहे. मात्र, अद्याप पर्याय मिळू शकलेला नाही. या ठिकाणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना मैदानात उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. परंतु शेलार येथून लढायला इच्छुक नाहीत. उलट त्यांनीच या मतदारसंघात पूनम महाजन याच लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. मात्र, यावरही निर्णय होऊ शकला नाही.

यासोबतच ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु या जागेवर भाजपने दावा केला आहे. तसेच ठाण्यामुळे पालघरचा निर्णय होणे बाकी आहे. यासोबतच नाशिकमध्ये तर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटानेही दावा केला आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. ते येथून पुन्हा मैदानात उतरू इच्छितात. परंतु भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले. यासोबतच येथून भाजपचे दिनकर पाटीलही इच्छुक आहेत. हीच स्थिती सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत आहे. येथेही तिन्ही पक्षांचा दावा आहे. येथून उदयनराजे भोसले भाजपकडून मैदानात उतरायला इच्छुक आहेत. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा केला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गवर राणे, सामंतांचा दावा

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा जागेवर महायुतीत चढाओढ सुरू आहे. शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये भेट घेतली. यावरून देवेंद्र फडणवीस आणि किरण सामंत यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय भाजपचे हायकमांड घेणार आहे. अर्थात अमित शहा यावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

छत्रपती संभाजीनगरवरूनही वाद

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे भागवत कराड इच्छुक आहेत. ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांनी येथे तयारी केली आहे. परंतु हा शिवसेनेचा गड मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी या मतदारसंघावर दावा केला असून, येथून संदीपान भुमरे किंवा मराठा आरक्षणावर लढणारे विनोद पाटील यांना मैदानात उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप ही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघाचा निर्णयही प्रलंबित आहे.

logo
marathi.freepressjournal.in