
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातच काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने दिला होता. एकनाथ शिंदे हेही त्या शिष्टमंडळाचा भाग होते,” असा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला.
२०१४ मध्ये निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना युती अस्तित्वात आली खरी; पण दोन्ही पक्षांत सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. भाजपला धक्का देऊन नवीन राजकीय समीकरण आकारास आणण्याचे प्रयत्न त्यावेळी शिवसेनेने केल्याचे अशोक चव्हाण यांच्या विधानावरून उघड झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करू या, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे. त्यात शिवसेनेचे तत्कालीन नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. “असे राजकीय समीकरण जुळवायचे असल्यास शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहील, अगोदर त्यांना भेटा, असा त्यांना मी सल्ला दिला होता,” असेही त्यांनी सांगितले. “त्यावर ते पवारांना भेटले की नाही, हे मला माहीत नाही,” असे सांगायलाही ते पुढे विसरले नाहीत.