नांदेड : नांदेडमधील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रात शुक्रवारी एका तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले आहे. भय्यासाहेब येडके असे आरोपीचे नाव आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर शुक्रवारी दुपारी ३ वाजून ५६ मिनिटाला भय्यासाहेब येडके हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रामध्ये गेला. यावेळी त्याने सर्व सोपस्कार पूर्ण केले. मतदानासाठी ईव्हीएमसमोर आल्यावर येडकेने आपल्या पॅन्टच्या खिशातील कुऱ्हाडीने ईव्हीएमवर वार केला. मशीन फुटल्याचा आवाज होताच केंद्रातील निवडणूक अधिकारी आणि एजंट यांना, येडके याला शॉक लागला की काय असे वाटले. त्याच्या हतातील कुऱ्हाड पाहताच सर्वच जण घाबरून केंद्राबाहेर आले. केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर याठिकाणी नवीन मशीन बसवून मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
बेरोजगारीमुळे रागाच्या भरात कृत्य
भय्यासाहेब येडके हा सुशिक्षित असून तो बेरोजगार असल्याचे समजते. उच्च शिक्षण घेऊनही त्याला नोकरी मिळत नसल्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या केंद्रावर एकूण मतदान ३७९ पैकी १८५ इतके झाले होते. कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडली तरी आतमधील डेटावर कोणताही परिणाम झाला नाही. तो व्यवस्थित आहे, असे केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.