"फडणवीस सांगतील ते काम करणार...अनुभव पणाला लावणार"; अखेर अशोक चव्हाणांनी हाती घेतलं 'कमळ'

"माझ्या आयुष्याची नवीन सुरूवात मी करत आहे. ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात आज मी...
"फडणवीस सांगतील ते काम करणार...अनुभव पणाला लावणार"; अखेर अशोक चव्हाणांनी हाती घेतलं 'कमळ'

काँग्रेसमधून सोमवारी राजीनामा दिल्यानंतर, येत्या दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यानंतर २४ तासांतच आज दुपारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. "माझ्या आयुष्याची नवीन सुरूवात मी करत आहे. ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे आणि त्यातून आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे", अशी पहिली प्रतिक्रिया चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांसमोर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, त्यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेवून देशात, राज्यात चांगलं काम करता आलं पाहिजे, राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं पाहिजे या भूमिकेतून आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. चव्हाण यांच्यासोबत नांदेडचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप-फडणवीस सांगतील ते काम करणार-

"भाजपची जी काही ध्येयधोरणं आहेत, त्यानुसार काम करेल. जे आदेश पक्ष देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्या पद्धतीने आगामी काळात काम करण्याचा माझा मानस आहे. त्यांच्याकडे दुसरी कोणतीही मागणी मी केलेली नाही. जे मला त्याठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे काम मी करेन. मी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचेही आभार मानतो. त्यांनी सहकार्य केलं. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मला कुणी जा असे सांगितले नाही. मी पक्षात नवीन आहे, त्यामुळे अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन", असे चव्हाण म्हणाले.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता -

पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत. पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पक्ष वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे पक्षाने मला भरपूर दिले तरी पक्ष सोडला अशी टीका करणे योग्य नाही. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही.

माझा अनुभव पणाला लावेल-

मी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच काम केलं आहे. फडणवीस विरोधीपक्ष नेते होते, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तोही कालावधी त्यांनी आणि मी अनुभवला. विकासाच्या कामांमध्ये नेहमी पॉझीटीव्ह भूमिका घेवून आम्ही एकमेकांना साथ दिली आहे, असेही ते म्हणाले. मी जिथं होतो तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल, असेही चव्हाण म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in