भाजपच्या प्रभारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
भाजपच्या प्रभारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची तुर्तास प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर भाजपच्या अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार अनिल सोले, तर सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व सहप्रमुखपदी बीड येथील प्रवीण घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केली आहे.

भाजपचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपसाठी दिवसरात्र एक केला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२ जागांवर विजय मिळाला. या विजयात बावनकुळे यांचाही मोठा वाटा होता. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून बक्षीस देण्यात आले आणि त्यांच्यावर महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बावनकुळे मंत्री झाल्याने भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. या पार्श्वभूमीवर तीन वेळा आमदार म्हणून विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी घोषणा केली.

समिती प्रमुखांची नावे घोषित

प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत छत्रपती संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह व पुणे येथील योगेश गोगावले यांना सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) यांची व अभियान सहप्रमुख म्हणून बीड येथील प्रवीण घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in