
नांदेड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्याचवेळी महायुतीला मात्र मोठा फटका बसला. महाविकास आघाडीनं ३० जागांवर विजय मिळवला तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. या निवडणूकीत भाजपला केवळ ९ जागांवर विजय मिळवता आला. आता भाजपनं आपलं लक्ष विधानसभा निवडणूकीवर केंद्रीत केलं आहे. यादरम्यान नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भाजप पक्ष सदस्यत्वाचा दोनच दिवसांपूर्वी राजीनामा-
भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सूर्यकांता पाटील यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. आज त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. आज मुंबई येथे सुर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सुर्यकांता पाटील यांची घरवापसी-
सूर्यकांता पाटील पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील 10 वर्षांपासून सुर्यकांता पाटील ह्या भाजपामध्ये काम करीत होत्या. सूर्यकांता पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे. भाजपाने पाटील यांना कुठलीही जवाबदारी दिली नव्हती. त्यामुळेच सुर्यकांता पाटील ह्या भाजपा पक्षावर नाराज होत्या, असं बोललं जात आहे. त्यामुळं १० वर्षानंतर त्यांची घरवापसी होऊ शकते.