शरद पवारांचा भाजपला धक्का, मराठवाड्यातील मोठा नेता लवकरच करणार पक्षप्रवेश

भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
शरद पवारांचा भाजपला धक्का, मराठवाड्यातील मोठा नेता  लवकरच करणार पक्षप्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

सुधाकर भालेराव यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळू शकते. ते मागासवर्गीय समाजातील महत्त्वाचे नेते असून उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यांच्याऐवजी अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांनी अनिल कांबळे यांचा पराभव केला होता. परंतु राष्ट्रवादीतील फुटीनंतर संजय बनसोडे अजित पवारांसोबत गेले. सध्या ते क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहेत. यंदाच्या निवडणुकीत संजय बनसोडे हे महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळं त्यांना कडवं आव्हान देऊ शकतील, अशा सुधाकर भालेराव यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन शरद पवारांनी मोठा डाव टाकला आहे. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर असू शकतात. यानिमित्तानं पुन्हा एकदा पवार काका-पुतण्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालानंतर राज्यातील राजकिय चित्र बदललं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इतर पक्षांतून भाजपमध्ये नेत्यांची रिघ लागली होती. मात्र महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर अनेक मोठे नेते महायुतीतून महाविकास आघाडीच्या दिशेने येऊ लागले आहेत. काहीच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे नेते राजु शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in