राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्या १५ फेब्रुवारी असून त्याआधी महाराष्ट्रातील ६ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात येत आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपनेही तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटानेही माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.
मिलिंद देवरा काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. लगेचच त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे हे त्यांच्यासाठी एकप्रकारचं गिफ्ट ठरलंय. देवरांना दक्षिण मुंबईतून लोकसभेचं तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र, शिंदे गटाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. उद्या देवरा आपला अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. तथापि, महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मात्र अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही.
भाजपकडून कोण?
भाजपने महाराष्ट्रातून एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नारायण राणेंचा पत्ता यावेळी कापण्यात आला असून दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षातून आलेल्या अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश आहे.