मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. या निर्णयाने १७ नंबरचा अर्ज भरून खासगीरित्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना धक्का दिला आहे. खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जात ३० रूपयांनी, तर नावनोंदणी शुल्कात ११० रूपयांनी वाढ केली आहे. तर नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षाशुल्क ४२० रूपयांवरून ४७० रूपये केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे दर जाहीर केले आहेत. या शुल्कवाढीबाबत सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना देण्यात याव्यात असे निर्देश मंडळाने विभागीय शिक्षण सचिवांना दिले आहेत. मंडळाने प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका, प्रमाणपत्र लॅमिनेशन, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात वाढ केली नसली तरी नियमित, खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात तसेच श्रेणीसुधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ केली आहे.
आधीचे दर आताचे दर
नियमित परीक्षा शुल्क ४२० ४७०
श्रेणीसुधार परीक्षा ८४० ९३०
पुनर्परीक्षार्थी ४२० ४७०
फॉर्म १७ परीक्षा अर्ज १०० १३०
फॉर्म १७ नावनोंदणी ११०० १२१०