
पुणे : राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आठ ते २५ एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. मात्र, सदरील वेळापत्रक कोणत्याच दृष्टीने सुसंगत नसल्याचे कारण पुढे करत प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश रद्द करून प्रचलित पद्धतीनुसार परीक्षांचे वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन शाळा स्तरावरच असावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सन २०२४-२५ मध्ये वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी दोनचे (नियतकालिक मूल्यांकन चाचणी) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आठ ते २५ एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घेण्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रचलित पद्धतीनुसार चाचणी परीक्षा आयोजित करणे हे शाळा स्तरावरचे नियोजन असते. वाढता उष्मा, शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षक-विद्यार्थी संख्या, उत्तरपत्रिका तपासणे, गुणतक्ते तयार करणे, संकलित/वार्षिक परीक्षा नोंदवहीत निकाल नोंदविणे, विद्यार्थी निहाय स्वतंत्र गुणपत्रक भरणे, नामवर प्रमोशन नोंदी घेणे आणि इयत्ता अखेर शाळेतून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे दाखले तयार करणे आणि महाराष्ट्र दिनी (१ मे) निकाल जाहीर करणे, अशी सर्व परीक्षा विषयक कामे असतात.
उत्तरपत्रिका तपासणे, संकलित निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे, संचयी नोंदपत्रक लिहिणे इत्यादी कामे चार ते पाच दिवसात होऊ शकत नाहीत. माध्यमिक शाळेत विषय वाईज शिक्षक असतात. एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान पाच विषयाचा कार्यभार यानुसार ३५० ते ४०० उत्तर पत्रिका चार ते पाच दिवसात तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. मराठवाडा, विदर्भ व इतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कडक ऊन, पिण्याच्या पाणीटंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता एवढ्या उशिरापर्यंत परीक्षा ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्यासाठी परिस्थिती सुसंगत नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ७५% पेक्षा अधिक प्राथमिक शाळांत स्वतंत्र मुख्याध्यापक नाही. मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडे एकापेक्षा अधिक वर्गाचे अध्यापन असून परीक्षेचे सर्व कामकाज त्यांनाच बघावे लागते. आरटीईमधील तरतुदीनुसार चाचण्या घेण्याचे नियोजन हे संबंधित शाळेकडेच आहे. सोबतच इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा एप्रिलमध्येच घ्यावा लागतो. वाढत्या उन्हासोबतच पाण्याचे दुर्भिक्ष आणि वीजपुरवठा खंडित होणे, इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, या उद्देशानेच १५ एप्रिलपर्यंत परीक्षांचे आयोजन केले जाते. त्यानुसार वरील वास्तव लक्षत घेता २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याचे वेळापत्रक कोणत्याही दृष्टीने सुसंगत नसल्याने त्यामध्ये बदल करावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.