मुंबई : लोकसभा निवडणुकीत महापालिकेतील अतिआवश्यक सेवेत मोडणाऱ्या रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी नेमण्यात आले होते; मात्र, आगामी विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीतून रुग्णवाहिका, शववाहिनीवरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात येईल. त्याऐवजी इतर व्यवस्था करून देण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्र्यांनी विधान परिषदेत दिली.
केईएम रुग्णालयामधील शववाहिनीवरील चालकाला निवडणूक कामासाठी नेमण्यात आले होते. ही शववाहिनी बंद होती. त्याचा गैरफायदा खासगी शववाहिका चालकांनी घेतला आणि मृतांच्या नातेवाईकांची लूटमार केली. त्याचबरोबर केईएम तसेच पालिका रुग्णालयातील यानगृहातील रिक्त पदे तातडीने भरा, महापालिकेतील अतितातडीच्या सेवा विभागातील कर्मचाऱ्यांना विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या कामात जुंपू नका, अशी विशेष उल्लेख सूचना विलास पोतनीस यांनी मांडली होती. त्यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.
यानगृहातील रिक्त पदेही भरणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, यानगृहातील रिक्त पदेही आचारसंहिता लागण्याआधी तातडीने भरण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला केल्या जातील, असेही सांस्कृतिक मंत्र्यांनी स्पष्ट केले.