कराड विमानतळाचे विस्तारीकरण वर्षभरात पूर्ण होणार; पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली माहिती

जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
कराड विमानतळाचे विस्तारीकरण वर्षभरात पूर्ण होणार; पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली माहिती

कराड : एका वर्षात कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि रात्रीच्या वेळी विमान सेवा सुरू करणे, याबाबीला प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढीला चालना मिळणार आहे, असे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मंगळवारी दुपारी झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपवनसरंक्षक आदिती भारद्वाज, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.

कराड विमानतळ विस्तारीकरण व नाईट लॅडींग हा विषय अनेक वर्षापासूनचा प्रलंबित आहे. सन २०१२-१३ मध्ये विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याची असणारी १ हजार २८० मीटरची धावपट्टी वाढवून ती १ हजार ७०० मीटर करण्यात येणार आहे.

विस्तारीकरणासाठी ४८ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. जवळपास ६२ टक्के खातेदारांना भूसंपादन पोटी मिळणारा निधी शासनाने वितरीत केला आहे. उर्वरित खातेदारांना पंधरा दिवसांची नोटीस देवून भूसंपादनाची भरपाई स्विकारण्याचे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.

भरपाईची रक्कम न स्विकारल्यास रकमेचा भरणा कोर्टात करण्यात येवून जमीन ताब्यात घेण्यात येईल व संपादित जमिनीस लवकरात लवकर शासनाचे नाव लावण्याच्या कामास प्राधान्य देण्याचा निर्णय पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत झाला. यावेळी एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या नियमानुसार जी बांधकामे, टॉवर्स अडथळा निर्माण करणारी ठरतील ती अतिक्रमणे काढण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही या बैठकीत पालकमंत्री देसाई यांनी दिले.

पाटण तालुक्यात १ हजार ६२ पवनचक्क्यांची नोंद असून उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पवनचक्कीची नोंद कटाक्षाने झालीच पाहिजे याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांचे क्रमांक देवून त्याचे जिओ टँगींग करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. पाटण तालुक्यातील ज्या ग्रामपांचायतीच्या हद्दीमध्ये पवनचक्की उभ्या आहेत त्या संबंधित कंपन्याकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कराबाबतची आढावा बैठकही याचवेळी पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांत सुनील गाडे, महाउर्जाचे महाव्यवस्थापक शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in