
मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर तीन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. मार्गाची क्षमता नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने ही एक्स्प्रेस चालविण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या एक्स्प्रेसच्या वेळेत दादर-गोरखपूर रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. कोकण मार्गावर धावणारी एक्स्प्रेस बंद करून रेल्वेने उत्तर प्रदेशसाठी एक्स्प्रेस सुरू केल्याचा आरोप ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ने केला आहे.
रत्नागिरी-दादर पॅसेंजर चाकरमान्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होती. परंतु, मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी सुरू करण्यासाठी मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत ती बंद केली व नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली. दिवा स्थानकात रेल्वेगाडीमध्ये पाणी भरण्याची सुविधा नसल्याने ही गाडी पनवेल येथे पाणी भरण्यासाठी नेण्यात येते. त्यामुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला ३० ते ४५ मिनिटे उभे राहावे लागते. त्यामुळे गाडीचा वक्तशीरपणा सुधारला नाहीच. याउलट प्रवाशांच्या त्रासामध्ये भर पडत चालली आहे.
दिवा ते दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर ०१०२७/०१०२८ दादर गोरखपूर (चार दिवस) आणि ०१०२५/०१०२६ दादर बालिया (तीन दिवस) या विशेष रेल्वेगाड्या (दैनिक) सुरू केल्या आहेत. नवीन वेळापत्रकात या रेल्वेगाड्यांचा समावेश करण्यात आला असल्याने ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ने नाराजी व्यक्त केली आहे.