सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस

ज्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून भाजपने अजित पवार यांच्या विरोधात रान पेटवले...
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र

विशेष प्रतिनिधी/मुंबई

ज्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून भाजपने अजित पवार यांच्या विरोधात रान पेटवले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच घोटाळ्याचे भांडवल करून राज्यात प्रचार करीत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीला कोंडीत पकडले, त्याच सिंचन घोटाळ्यात आता अजित पवार निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र खुद्द भाजपचे राज्यातील नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सिंचन घोटाळ्यात तथ्य आहे, परंतु यात अजित पवार दोषी नाहीत, असा जावईशोध फडणवीस यांनी लावला. यावरून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंचन घोटाळ्याबद्दल स्पष्टीकरण दिले. सिंचन घोटाळ्यात तथ्य आहे. हा घोटाळा ज्या काळात घडला, त्यावेळी अजित पवार हे त्या खात्याचे मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप होणे साहजिक आहे. त्याच मुद्यावरून आम्ही त्यांच्यावर आरोप केला होता. मुळात त्या खात्याचे मंत्री असल्याकारणाने त्यांना जबाबदार धरणे साहजिक होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आरोप केले. मात्र, तपासानंतर कोणत्याही आरोपपत्रात किंवा तपास यंत्रणांनी अजित पवार यांची थेट भूमिका असल्याचे म्हटलेले नाही. असा आरोप झाल्यानंतर तपासाला सामोरे जावे लागते, असे फडणवीस म्हणाले.

निर्दोष असल्याचा जावईशोध कसा लावला - पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस यांच्या या विधानावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप नोंदविला आहे. अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळ्याचा मुद्दा पंतप्रधानांनी सातत्याने मांडला. तसेच अजित पवार यांच्यावर बरेच आरोप आहेत, त्यांना सोबत घेऊ नका, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. असे असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार निर्दोष असल्याचा जावईशोध कसा लावला, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in