
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून शिंदे सरकारला विविध मुद्यांवरुन घेरण्याची तयारी विरोधकांनी सुरु केली आहे. आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचीत मंत्र्यांची सभागृहाला ओळख करुन दिली. यानंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दालनात प्राप्त झालेले सर्व निवेदन नाकारल्याची माहिती दिल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन घोषणाबाजी केली.
यानंतर अध्यक्षांनी बाळासाहेब थोरात यांना बोलण्याची परवानगी दिली. यावेळी थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलं. राज्यातील पावसाची स्थिती गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचं सांगत ५० टक्के क्षेत्रात अद्याप पाऊस नसल्याचं थोरात म्हणाले. आतापर्यंत फक्त २० टक्के पेरण्या झाल्या असून शेतकरी हवालदिल झालाय. अतिवृष्टी गारपीटमुळे देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. असल्याचं बाळासाहेब म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्लीवारी यामुळे सरकारचे शेतकऱ्यांचं लक्ष0 नाही. त्यामुळे स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करण्याची मागणी बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
बाळासाहेब थोरात यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारला गांभिर्य आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ८० टक्केच पेरण्या झाल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारने नियोजन केलं असल्याचं फडणवीस म्हणाले. गेल्या वर्षभरात १० हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. असला विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.