मुंबई : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे झालेले मनोमिलन तसेच आमदारांची विविध प्रकरणे बाहेर पडू लागल्यामुळे कोंडीत सापडलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे सध्याचे राजकीय चित्र असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरेंना सत्तेत आमच्यासोबत या, अशी थेट ऑफर हसतखेळत दिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत थेट उद्धव ठाकरेंनाच एकत्र येण्यासाठी टाळी दिली. उद्धवजी २०२९ पर्यंत तरी आमचा विरोधी पक्षात येण्याचा काहीच स्कोप नाही. पण तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप असून त्याबाबत विचार करता येईल. त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, अशी थेट ऑफर फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युत्या-आघाड्या किंवा नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच, मुख्यमंत्र्यांची ही ऑफर सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये धडकी भरवणारी ठरली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. यामुळे सभागृहातील वातावरण हलकेफुलके झाले होते. मिश्किल टोमणे, टोले आणि खुली ऑफर अशा रंगतदार वातावरणात दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला.
दानवे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त होत आहेत. माझ्यापेक्षा ते लहान आहेत. जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहतील, तोपर्यंत आपण दोघे राहू शकतो. राहुल गांधी माझ्यापेक्षाही ६ महिने मोठे आहेत. दानवे हे माझ्यापेक्षा लहान असले तरी माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत. त्यांचे राजकीय जीवन भाजपमध्ये सुरू झाले. प्रभावी नेते म्हणून ते काम करीत होते. त्यावेळी आमच्या पक्षात वाद झाल्याने पक्षाने त्यांना सोडले. तेव्हाचा आमचा मित्र पक्ष, शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. त्यांच्यामुळे चांगल्या पत्रकाराला आपण मुकलो. पण एक चांगला नेता सभागृहाला मिळाला. कधी आक्रमक होत, कधी गौप्यस्फोट करत त्यांनी या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. या टर्मचा त्यांचा हा निरोप समारंभ असला तरी त्यांनी पुन्हा सभागृहात यावे, या माझ्या शुभेच्छा आहेत,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
सभागृहातील गोष्टी खेळीमेळीने घ्याव्या -उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो, हे माझ्या वडिलांची आणि आजोबांची पुण्याई आहे. पण ज्यांनी त्यांना (शिंदे) सोन्याच्या चमच्याने भरवले, त्या अन्नाशी त्यांनी प्रतारणा केली. हे पाप जनता विसरू शकणार नाही.”
फडणवीस काय म्हणाले?
सभागृहात उपस्थित असलेले सदस्य उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, “२०२९ पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात येण्याचा स्कोप नाही. तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप असून याबाबत विचार करता येईल. त्यांचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू,” अशी ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोन्याच्या चमच्यावरून शिंदे-ठाकरेंची टोलेबाजी
“अंबादास सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत, ते सामान्य कार्यकर्त्यांमधून घडलेले नेतृत्व आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्या कामाचे कौतुक करत ठाकरेंना टोले लगावले. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “अंबादास तुमचा मला अभिमान आहे. पदे येतात आणि जातात. मात्र जनतेच्या मनात आपली प्रतिमा काय राहते, हे आपल्या आयुष्याचे फलित असते. अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. पण भरलेल्या ताटाशी त्यांनी प्रतारणादेखील केली नाही. ज्यांनी ताट वाढून दिले, त्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. नाहीतर त्या ताटामधील, जे आहे ते माझेच आहे आणि आणखी मिळावे म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचे असा अपराध तुम्ही केला नाहीत. त्याबद्दल जनता तुम्हाला धन्यवाद देत असेल,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना टोले हाणले.“भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. अंबादास दानवे या सभागृहातील आपल्या कारकिर्दीची पहिली टर्म पूर्ण करत आहेत. त्यामुळे अंबादास दानवे तुम्ही जोरात ‘पुन्हा येईन’ म्हणा. या घोषणेला खूप महत्त्व आहे. पण त्याच पक्षातून ‘पुन्हा येईन’ म्हणा,” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मी पुन्हा येईन, पण कुठून ते विचारू नका -दानवे
“मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका. अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्या याआधीच्या विधानाची आठवण करून दिली. दानवेंच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. त्यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याचा आणि संघातल्या सुरुवातीच्या काळाचा उल्लेख करत भावनिक आठवणींनाही उजाळा दिला.