मुंबई : देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षड्यंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. या आरोपानंतर आता विरोधकांनी फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षानेही ट्विट करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताबडतोब चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
“मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून अशाप्रकारची वागणूक दिली जात असेल, तर ती या राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. या आरोपाची मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधानांनी दखल घेऊन उपमुख्यमंत्र्यांची ताबडतोब चौकशी करायला हवी. आंदोलकांच्या जीवावर उठलेल्या सरकारचा जाहीर निषेध,” असे म्हणत शरद पवार गटाने महायुतीवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षड्यंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सरकारला शिव्या दिल्या, त्याचा त्यांना राग आहे. त्यामुळे मला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जे-जे त्यांच्याविरोधात गेले त्यांना ते संपवत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी पाहिजे असेल तर ही बैठक संपल्यानंतर मी पायी चालत सागर बंगल्यावर येतो. तिथे माझा बळी घ्या, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांना माझा राग येतो. ते माझं उपोषण सोडायला येणार होते, मात्र मी त्यांना येऊ दिले नाही, याचा त्यांना राग आहे. ते माझ्याविरोधात ब्राम्हणी कावा रचत आहेत. पण मी त्यांचे सर्व डाव उघडे करणार आहे.”