सुरतबाबतच्या फडणवीसांच्या वक्तव्याने नवा वाद
मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुरत लुटली नाही, या वक्तव्याने राज्यात नवीन वाद पेटला आहे. फडणवीस यांचे विधान दिल्लीतील नेत्यांना खुश करण्यासाठी आहे, असा टोला इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी लगावला. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्यांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहिले याचे वाचन फडणवीस यांनी करावे, असा सल्ला सावंत यांनी दिला.
सुरत हे शहर शिवाजी महाराजांनी कधीच लुटले नाही. असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका वादाला तोंड फोडले. इतिहासकार आणि विरोधी पक्षनेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना सुरत लुटीशी संबंधित पुस्तके आणि संदर्भ वाचण्याचा सल्ला दिला आहे. सुरत हे मुघल साम्राज्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अनेक ब्रिटिश, डच, फ्रेंच आणि मध्यपूर्व राष्ट्रांची व्यापारी केंद्रे सुरत येथे होती. त्या काळात ते जगाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. शिवाजी महाराजांनी एकदाच नव्हे तर दोनदा सुरत लुटली. शत्रूला मुळापासून हादरवून टाकण्यासाठी त्यांची महत्त्वाची आर्थिक केंद्रे लुटणे हा त्या काळातील राजकीय डावपेच होता. अनेक इतिहासकारांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, महाराजांनी सरकार चालवण्यासाठी स्वराज्याची तिजोरी भरण्यासाठी सुरत लुटली होती. औरंगजेब लाहोरला असताना सुरत लुटीची बातमी मिळाली. मात्र नागपूरला राहणारे फडणवीस यांना सुरत लूट अजून समजलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला.
फडणवीसांनी चिंतन बैठक घ्यावी - राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भाजपचे लोक चिंतन बैठक करतात. त्यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, त्यांचा संघर्ष यावर चिंतन बैठक बोलावली पाहिजे. सूरतचे व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते. स्वराज्याच्या विरोधात ते वागत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या व्यापाऱ्यांना लुटले. कारण त्यांचे पैसे ईस्ट इंडिया कंपनीकडे जात आहेत. राष्ट्रीय हिताचा मुद्दा लक्षात घेऊन सूरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली. फडणवीस यांचा इतिहास वेगळाच आहे. इतिहासाची मोडतोड करायची हेच त्यांना माहीत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.