

लातूर : ‘लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही’, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर त्यांच्यावर प्रखर टीका झाली. चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूरमधील सभेत, ‘आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर असून आमची लढाई ही काँग्रेसशी आहे’, असे म्हणत चव्हाणांची बाजू सावरून घेतली.
रवींद्र चव्हाण यांचे विधान विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्याही जिव्हारी लागले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरमध्ये झालेल्या सभेत या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी नितांत आदर आहे,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘लातूर या भूमीने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिले. यामध्ये चाकूरकर साहेबांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगराध्यक्षपदापासून ते लोकसभा अध्यक्ष, देशाचा गृहमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास आहे. राजकारणात अशाप्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील-निलंगेकर तसेच माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी लातूरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. विलासराव देशमुख यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जडघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. म्हणून आम्हाला त्यांचा आदर आहे,’ असे फडणवीस यांनी म्हटले.
‘रविंद्र चव्हाणांचे शब्द चुकीचे गेले, त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. विलासराव देशमुख आम्हाला आदरणीय आहेत. आमची लढाई काँग्रेसशी असली तरी विलासरावांबद्दल नितांत आदर आहे,’ असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
लातूरची पाणीप्रश्न मिटवणार -फडणवीस
अर्चनाताई पाटील विजयाच्या जवळ पोहोचल्या होत्या. ती कसर महापालिकेत भरून काढायची आहे. लातूरमध्ये परत कधीही रेल्वेने पाणी आणण्याची गरज लागू नये, असे काम करायचे आहे. जवळपास २५९ कोटी रुपयांची योजना लातूरकरिता आपण मंजूर केली आहे. या योजनेचे २२ टक्के कामही पूर्ण झाले आहे. धनेगाव धरणापासून हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाइपलाईन असेल, त्यातून आपण पाणीपुरवठा करणार आहोत. आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे, त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.