गुंडांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न हाणून पाडू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
नाशिक : गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, त्याचा किंवा त्याला राजकीय पाठबळ देणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही. मग तो भाजप किंवा महायुतीचा असला तरी सोडले जाणार नाही, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. गुंडांना राजाश्रय देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. नाशिकमधील वाढत्या गुन्हे कृत्यानंतर स्थानिक पोलीस आयुक्त योग्य दिशेने काम करीत असून मी गृहमंत्री या नात्याने त्यांना पूर्ण मोकळीक दिली आहे. ते गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सर्व प्रयत्न करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक येथील स्वामी नारायण मंदिर सभागृहात पार पडली त्यावेळी मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
योगेश कदम यांची पाठराखण
पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ याचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्याची शिफारस गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. यावरून कदम यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कदम यांची पाठराखण करीत, परवाना दिला गेलाच नसल्याचा दावा केला. गृह राज्यमंत्री म्हणून कदम यांनी एक सुनावणी घेतली, मात्र पोलीस आयुक्तांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर प्रत्यक्षात परवाना दिला गेला नाही. म्हणूनच कदम त्यांच्यावरील आरोपांत तथ्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संघटनात्मक परिस्थिती पाहून युती!
आजच्या बैठकीत आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला आहे. महायुतीतील पक्षांतील संघटनात्मक परिस्थिती पाहून युती कुठे होऊ शकते याचा आढावा घेत आहोत, असे सांगताना काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती करू, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील स्थानिक राजकीय परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह बैठकीला भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.