मुंबई : आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही लोक जाणीवपूर्वक देशात टाळेबंदी लागेल, असा संभ्रम पसरवत आहेत. टाळेबंदी पसरवणारे लोक अक्षरशः देशद्रोह करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. टाळेबंदीबाबत खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.
पश्चिम आशियाई देशातील युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासंदर्भात फडणवीस यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यात पेट्रोल, डिझेल तसेच सिलिंडर गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा केला.
लोकांना खोटी माहिती देऊन भडकविणे हे देशविरोधी आहे. इंधन आणि एलपीजी गॅसबाबत जे चुकीची माहिती देत आहेत ते देशविरोधी कृत्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परिस्थिती हाताळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे इंधन आणि एलपीजी गॅस पुरवठा विस्कळीत होणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
देशात एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकू नयेत यासाठी केंद्र सरकारने जे निर्णय घेतले त्याबद्दल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. आपल्या आजुबाजूच्या देशांचा विचार करता आखाती युद्धामुळे त्यांच्यावर काही ना काही परिणाम झाला आहे. मात्र, आपल्या पंतप्रधानांनी परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत ते पाहता आपले दैनंदिन जीवन कमीत कमी प्रभावित होईल, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शहरी भागातील एलपीजी पुरवठ्याचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात पाईप गॅस पुरवठ्याच्या अटी, शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. पाईप गॅसमुळे शहरांचा भार कमी केला तर भविष्यात अडचण येणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.