लष्कराचे बनावट गणवेश बाजारात, नगरमध्ये गुप्तचर, पोलिसांची कारवाई

भारतीय लष्कराने तयार केलेल्या नवीन गणवेशाची हुबेहूब ‘कॉपी’ करून ते बाजारात आणण्याच्या कटाचा लष्करी गुप्तचर विभाग व महाराष्ट्र पोलिसांनी भंडाफोड केला.
लष्कराचे बनावट गणवेश बाजारात, नगरमध्ये गुप्तचर, पोलिसांची कारवाई

आशिष सिंह/मुंबई

भारतीय लष्कराने तयार केलेल्या नवीन गणवेशाची हुबेहूब ‘कॉपी’ करून ते बाजारात आणण्याच्या कटाचा लष्करी गुप्तचर विभाग व महाराष्ट्र पोलिसांनी भंडाफोड केला. अहमदनगर जिल्ह्यात या प्रकरणी सुरेश प्रीतमदान खत्री (४९) याला अटक केली आहे. या खत्रीचे दिल्ली, राजस्थानमध्ये असलेले कनेक्शन पाहता लष्कर, पोलीस या कटामागील म्होरक्याचा शोध घेत आहेत. कारण बनावट गणवेशांचा वापर करून दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय लष्कराने आपल्या सैनिकांसाठी नवीन गणवेश तयार केले. त्याची नक्कल असलेले गणवेश तात्काळ तयार केल्याने खळबळ उडाली आहे. ४० गणवेश जप्त केले असून पकडलेल्या संशयिताचे राजस्थान व नवी दिल्लीत कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, संशयित इनोव्हा कार अहमदनगरमधील जामखेड रोडवर सीएसडी कँटीन येथे पोहचल्याचे लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली. या कारमध्ये लष्कराचे नवीन बनावट गणवेश आढळले. ही बातमी अत्यंत महत्त्वाची व संवेदनशील होती. अहमदनगर व पुणे जिल्हा हे महत्त्वाचे असून तेथे लष्कराची महत्त्वाची आस्थापने आहेत. हे बनावट गणवेश घालून संवेदनशील विभागात संशयित घुसू शक्यता नाकारता येत नाही. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने ही माहिती अहमदनगर पोलिसांना दिली. त्यानंतर लष्कर व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हे बनावट गणवेश पकडले.

या प्रकरणी अटक आरोपी खत्रीने चौकशीत सांगितले की, तो देवळाली कॅम्पचा रहिवासी आहे. देवळाली लष्कराचे प्रशिक्षण केंद्र आहे. संबंधित इनोव्हा कारमध्ये ४० बनावट गणवेश आढळले. जेव्हा त्याला गणवेशाबाबत विचारले, लष्करी अधिकाऱ्यांना विक्रीसाठी मी गणवेश आणले आहेत. तुझ्याकडे लष्कराचे गणवेश विकायचा परवाना आहे का? असे विचारताच त्याने नकार दिला. तो तपास यंत्रणांची दिशाभूल करत आहे.

सूत्रांनी सांगितले की, अटक आरोपी सुरेश खत्रीचे राजस्थान व दिल्लीत धागेदोरे आहेत. दिल्ली ही राजधानी असून राजस्थान हा पाकिस्तानला लागून असलेले राज्य आहे. हे बनावट गणवेश कोणाला दिले जाणार होते, त्याचा शोध सुरू आहे.

अहमदनगरच्या भिंगर कॅम्प येथून खत्रीला ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in