मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे बनावट कॉल! महावितरणकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे बनावट कॉल! महावितरणकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी
प्रातिनिधिक छायाचित्र - Freepik
Published on

भास्कर जामकर/नांदेड

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार महावितरणकडे प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये तसेच अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक आहे. शेतकऱ्यांनी ज्या क्रमाने नोंदणी केली आहे त्यानुसार पंप बसविण्यात येत आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो.

केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ पंपाचे बिल येत नाही. तसेच दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून व इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत. शेतकऱ्याने आपल्या हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या एजन्सीची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट होते. यादीनुसारच पंप बसविण्यात येत आहेत.

साहित्याची मागणी चुकीची

शेतात सौर कृषी पंप बसविताना काही ठिकाणी संबंधित एजन्सीकडून शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च अथवा अन्य साहित्याची मागणी झाल्याच्याही तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. परंतु सौर कृषी पंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे साहित्याची मागणी झाल्यास त्याची दखल घेऊ नये व महावितरणकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टोल फ्रीचे आवाहन

बनावट कॉल आले तर शेतकऱ्यांनी त्याबाबत महावितरणच्या १८०० २३३ ३४३५ अथवा १८०० २१२ ३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. तसेच जवळच्या महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून शंकाचे निरसन करता येईल, असे सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in