

आशिष सिंग/मुंबई :
मी ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्रात औपचारिक शिक्षण किंवा मान्यताप्राप्त पदवी मिळवलेली नाही, अशी कबुलीच भोंदूबाबात अशोक खरातने ईडीच्या चौकशीत दिली. ₹४२.८८ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेला भोंदू बाबा तथा स्वयंघोषित महाराज अशोक खरात याने ‘ईडी’ला सांगितले की, दोन दशकांपासून तो अध्यात्मिक सल्लागार म्हणून आपली प्रतिमा निर्माण करत होता आणि त्याच्या भाकितांवर अन् अनुष्ठानांवर विश्वास ठेवून उद्योगपती, राजकारणी आणि इतर प्रभावशाली व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होत होते.
खरातच्या या जबाबाचा उल्लेख ‘ईडी’ने मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. खरातचा मर्चंट नेव्हीतील निवृत्त कर्मचाऱ्यापासून नाशिकमधील अत्यंत प्रभावशाली स्वयंघोषित बाबा बनण्यापर्यंतचा प्रवास या जबाबात नमूद आहे. अध्यात्मिक शक्ती, यश आणि राजकीय प्रगती मिळेल या आशेने अनेक उद्योगपती, राजकारणी आणि इतर प्रमुख व्यक्ती त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि ‘अवतार पूजा’ करण्यासाठी येत असत. खरातने या प्रभावाचा वापर करून बेनामी बँक खाती, पतसंस्था आणि स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करून मनी लाँड्रिंगचे नेटवर्क उभे केले.
‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार, खरात नाशिकला परतल्यानंतर त्याने छोट्या कार्यालयातून अंकशास्त्र आणि अध्यात्मिक सल्ले देण्यास सुरुवात केली. त्याने ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही आणि त्याच्याकडे या क्षेत्रातील कोणतीही पदवी नाही. असे असूनही, लोकांनी एकमेकांना सांगून त्याच्याभोवती मोठा भक्तगण तयार केला. वैयक्तिक, आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांवर अध्यात्मिक मार्गदर्शन, अनुष्ठाने आणि अंकशास्त्राच्या आधारे उपाय शोधण्यासाठी भक्त त्याच्याकडे येत असत.
मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिर आणि श्री शिवनिका संस्थानाची स्थापना केल्यानंतर खरातचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप ‘ईडी’ने केला.
स्थावर मालमत्ता स्वत:च्या निधीतून खरेदी केल्या
ईडीच्या म्हणण्यानुसार, खरातने मान्य केले की, त्याची पत्नी, मुली आणि आई यांच्या नावावर असलेल्या अनेक स्थावर मालमत्ता प्रत्यक्षात त्याच्या स्वतःच्या निधीतून खरेदी केल्या होत्या. खरातने या खरेदीचे श्रेय शेतीचे उत्पन्न, मालमत्तेचे व्यवहार आणि अंकशास्त्र व अध्यात्मिक सल्लागार व्यवसायातून मिळालेल्या कमाईला दिले, परंतु या दाव्यांचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे किंवा नोंदी तो सादर करू शकला नाही.