
कराड : अंबर दिव्याची इनोव्हा कार, अंगावर आयपीएस अधिकाऱ्याची वर्दी, त्यावर इंग्लिशमध्ये लिहलेली 'आयपीएस'ची अक्षरे, हातात महागडी बॅग अन डायरी या थाटात वावरणाऱ्या 'तोतया' आयपीएस भामट्याच्या कारनाम्यांचा कराड पोलिसांनी चांगलाच पर्दाफाश केला. यामध्ये त्याने नोकरीचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सुमारे दीड ते दोन कोटींना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहेत.
श्रीकांत विलास पवार (३६) असे नाव सांगत असलेला सदर संशयित आपण आयपीएस अधिकारी असल्याची बनवेगिरी करून कराड परिसरातील तरुणांना शासकीय नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोंना गंडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
याप्रकरणी श्रीकांत विलास पवारला कराड शहर पोलिसांना मिळाली आणि या कथित आयपीएसला पोलिसांनी अटक केली. तोतया आयपीएसला पकडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आतापर्यंत प्रारंभी ४० लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. एका युवतीसह एका युवकाने सहा लाख आणि सात लाखांची फसवणूक या भामट्याने केल्याची तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्याकडे दिली आहे. जत परिसरातही याने अनेकांना गंडा घातला असून यातही २९ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.
पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात २०१५ साली या संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या भामट्याने परजिल्ह्यातील अनेकांना लाखोंचा गंडा घातली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.