पुणे: आज देशभरात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्पासाठी मतदान होत आहे. मतदान यादीत नाव नसल्याचा फटका अनेक मतदारांसह कलाकरांनाही बसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच पुणे लोकसभा मतदारसंघात आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चक्क काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावरच बोगस मतदान झाल्याचं समोर आलं आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या तिकीटावर माजी महापौर मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसच्या तिकीटावर आमदार रविंद्र धंगेकर निवडणूकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेही निवडणूक लढवत आहेत. दरम्यान आज पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे मतदानासाठी सेंट मीरा स्कूल येथील मतदान केंद्रावर गेले असता ते पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या नावाचं मतदान झालं होतं. या घटनेनंतर अरविंद शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून याबाबतची तक्रारही नोंदवली आहे.
माझ्या नावावर रेड लाईन मारली होती : अरविंद शिंदे
अरविंद शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, ''मी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलो, पण माझ्या नावावर रेड लाईन मारली होती. मला सांगितलं की तुमचं मतदान झालंय. माझ्या नावापुढे दुसऱ्याचाच शिक्का आणि सहीही वेगळीच असल्याचं दिसून आले. विशेष म्हणजे येथील आधारकार्डचा नंबरही माझा नव्हता. यावेळी पोलिंग एजंटने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, तर तिथेही दमबाजी करण्यात आली."
"या घटनेनंतर बॅलेट पेपरवर चॅलेंज करुन मी टेंडर व्होट करुन आलोय. मी ऑनलाईन तक्रारही केली आहे," असं शिंदे म्हणाले.