

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी आत्महत्याप्रकरणी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
या प्रकरणी संशयित आरोपी उपनिरीक्षक गोपाल बाळासाहेब बदने (रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण) व प्रशांत किसन बनकर (लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण) हे दोघेही न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार यापूर्वी राज्य राखीव दलाच्या समादेशक तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले होते.
मात्र राज्यातील विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्था व नातेवाइकांकडून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्याच्या अनुषंगाने शासनाने निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली असून, समिती लवकरच तपास सुरू करणार आहे.