

चंद्रपूर : चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील शेतकऱ्याला कर्ज फेड करण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझे कर्ज फेडण्यासाठी तू किडनी विक, असा संतापजनक सल्लाही सावकाराने या शेतकऱ्याला दिल्याचे बोलले जात आहे.
मिंथुर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितले की त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करायला एक लाख रुपये सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांच्याकडे चार एकर शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, नैसर्गिक प्रतिकूलतेमुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गाई खरेदी केल्या. गाई खरेदीसाठी त्यांनी दोन सावकारांकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु दुर्दैवाने खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या आणि शेतीही पिकली नाही. परिणामी, कर्जाचा भार अधिकच वाढत गेला. कर्जमुक्त व्हायला कुडे यांनी दोन एकर जमीन विकली, तसेच ट्रॅक्टर आणि घरातील मौल्यवान साहित्यही विकावे लागले. तरीही कर्जाची रक्कम फेडता आली नाही. एका लाख रुपयांवर दररोज दहा हजार रुपयांप्रमाणे व्याज आकारले जात असल्याने सुरुवातीचे एक लाख रुपयांचे कर्ज वाढत जाऊन ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले.
सावकराचा किडनी विकायचा सल्ला
कुडे हा पहिल्यांदा कोलकाता आणि नंतर कंबोडियात जाऊन गेला. तेथे त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी ८ लाख रुपयांमध्ये स्वतःची किडनी विकली. याबद्दल त्यांनी सावकारावर कायद्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.