अवकाळी व दुष्काळाने शेतकरी बेजार,छ. संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर!

लोकसभा निवडणुकीमुळे उन्हाच्या तडाख्यातही सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
अवकाळी व दुष्काळाने शेतकरी बेजार,छ. संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर!

सुजित ताजने/छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीमुळे उन्हाच्या तडाख्यातही सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी कमालीची घटली आहे. गावांमध्ये दिवसागणिक टँकरची संख्या वाढत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत पाणीटंचाई, दुष्काळ हे विषय बाजूला पडल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले नसल्याने नुकसानग्रस्तांना कधी मदत मिळेल, असा प्रश्न आहे. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांना या समस्यांचा विसर पडल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर कोणीही बोलायला तयार नाहीत. शासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रिया राबविण्यात गुंतली आहे. आज मराठवाड्यात १,४८० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. निवडणुकीमुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण होऊ शकले नाहीत.

मराठवाड्यात ९ ते २० एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने ९०० गावांमधील १६ हजार ५०० शेतकऱ्यांचे जवळपास ८ हजार ५०० हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते. या घटनेला १० ते १२ दिवसांचा कालावधी लोटला, तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. संपूर्ण महसूल यंत्रणाच निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने पंचनाम्यांना चांगलाच उशीर झाल्याचे दिसून येत आहे. यंत्रणेसह नेतेही निवडणुकीत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे. नुकसान झालेल्या ठिकाणचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

अवकाळीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३७ हेक्टर, जालना १,१०१, परभणी ३४८, हिंगोली ८७५, नांदेड ८८९, बीड १,९७७, लातूर एक हजार, धाराशिव जिल्ह्यात १,८७१ हेक्टर बागायती, जिरायती व फळपिकांचे नुकसान झाले. अवकाळीचा कहर अद्याप सुरूच आहे. या अवकाळीचा ९०० गावांतील १६ हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, त्यांचे जवळपास ८ हजार ३०० हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. वीज पडून १७ जणांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत. लहान-मोठी ३०७ जनावरे दगावली आहेत, तर ६३५ घरांची पडझड झाली.

निवडणुकांमुळे पंचनाम्यांकडे दुर्लक्ष

परंतु, संपूर्ण महसूल यंत्रणाच लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने पंचनाम्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. १२ दिवस होऊन गेले तरी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी निवडणुका पूर्ण होण्याची वाट पाहात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in