कापसाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

शेतकऱ्याची सतत भाव वाढण्याची अपेक्षा असल्याने तो बाजारात कापूस आणत नाही. गेल्या वर्षी देखील उत्पादनाच्या २० टक्के कापूस हा शेतकऱ्याने घरात ठेवला होता.
कापसाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत
PM

जळगाव : यंदा कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्याने कापूस मोठया प्रमाणावर लावला असला, तरी कापसाला भाव नसल्याने शेतकरी कापूस बाजारात विक्रीसाठी आणत नाही, तर बाजारात कापूस नसल्याने जिंनिग कारखाने ठप्प असल्याची स्थिती उदभवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना भाव आज दिला जाणे कठीण असल्याचे मत खान्देश जिनिंग कारखानदार संघाचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी 'दै. नवशक्ति'शी बोलताना सांगितले.

राज्यात सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यात पाच लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड होत असते. यंदा जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरमध्ये ही लागवड झालेली आहे, तर खान्देशात जळगाव धुळे नंदुरबारमध्ये नऊ लाख हेक्टरमध्ये ही कापसाची लागवड झाालेली आहे. कापूस हे रोखीचे पिक असून, यंदातरी चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर कापूस लावला आहे. दरवर्षी खान्देशात २५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. यंदा मात्र अवकाळी पावसाने कापसाचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाल्याने किमान १५  लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. खान्देशात २५ लाख गाठी इतक्या मोठया प्रमाणावर कापूस उत्पादन होत असल्याने खान्देशात १५०वर जिनिंग प्रसिंग कारखाने चालतात.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला ५२ हजार रू खंडी भाव दिला जात असून, भारतातील कापसाचा ५५ हजार रू खंडी भाव आहे. अशा स्थितीत कापसाची निर्यातहोणे देखील शक्य नाही. गाठींना मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्याला ६६००  ते ७००० रू भाव दिला जात आहे. याहून अधिक भाव जिनर देण्यास तयार नाही. परंतु, किमान आठ हजार रू भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी आज बाजारात कापूस आणण्यास तयार नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात भाव नसल्याने जिनर सात हजाराहून अधिक भाव शेतकऱ्याला देण्यास तयार नाहीत. खान्देशात कापसाचे उत्पादन झाालेले असले तरी बाजारात कापूस आलेला नाही. खान्देशात आज १५० जिनिंग कारखाने असले, तरी कापसाअभावी केवळ ५० कारखाने हे एका पाळीत कसेबसे सुरू आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यात केवळ अडीच लाख गाठी तयाार झााल्या असल्याचे जिनिंग प्रसिंग कारखानदार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी बोलताना सांगितले.

बाजाराच्या अनिश्चित वातावरणाचा फटका

शेतकऱ्याची सतत भाव वाढण्याची अपेक्षा असल्याने तो बाजारात कापूस आणत नाही. गेल्या वर्षी देखील उत्पादनाच्या २० टक्के कापूस हा शेतकऱ्याने घरात ठेवला होता. बाजाराच्या अनिश्चित वातावरणाचा  फटका हा शेतकरी आणि जिनिंग या दोघांनाही बसला आहे. दोघे अडचणीत आले आहेत. असे चालू राहील्या पुढील वर्षी ५० टक्के तरी कारखाने चालतील की नाही, वाचतील की नाही, अशी भीती प्रदीप जैन यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in