
लासलगाव : विंचूर येथे कांद्याच्या लिलावात दोनशे ते चारशे रुपयेपर्यंत प्रतिक्विंटल बाजार भाव पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी एक तासाहून अधिक वेळ कांद्याचे लिलाव बंद पाडत आपला संताप व्यक्त केला. विंचूर बाजार आवारात गुरुवारी सकाळच्या सत्रात २० ते ३० वाहनातील कांद्याचे लिलाव जाहीर करण्यात आले. या लिलावात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी तीनशे चारशे रुपयांची घसरण झाल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासनाला वेठीस धरले.
बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबु जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी मध्यस्थी करत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली. फेर लिलावामध्ये दोनशे रुपये विक्री झालेल्या कांद्याला ३०० रुपये, तर तीनशे ते चारशे रुपये विक्री झालेल्या कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये इतका बाजार भाव मिळाला; मात्र संचालकनी कांद्याचे लिलाव सुरळीत करून काढता पाय घेतला असता, कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती नंतर जैसे थे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.