मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली होती. आता याचा मतदारसंघात बाप-मुलगा आमनेसामने येणार असल्याचे दिसत आहे. महायुतीकडून गजानन कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
गजानन कीर्तीकर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. आज एका कार्यक्रमात गजानन कीर्तीकर यांनी उमेदवारीची घोषणा केली. “अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात गजानन कीर्तीकर लढणार आहे. होय मी लढणार आहे. मला या निवडणुकीत लढा असे सांगितले होते. पण, मी मुलाविरोधात लढल्यास तर समाजात वाईट संदेश जाईल, असे मी सांगितले होते”, असेही ते म्हणाले.
आता अमोलने मी वडिलांविरोधात लढणार नाही, असे सांगायला हवे, असे गजानन कीर्तीकर म्हणाले. आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन कीर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा खा. गजानन कीर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपा आमदार राजहंस सिंह यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या न्यायपत्राचा खरपूस समाचार घेतला.