मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले आदिवासी अधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मॅजिस्ट्रेट चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यावर पुढील महिन्यात १३ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
फादर स्टॅन स्वामी यांना भीमा कोरेगाव हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना जुलै २०२१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मृत्यूप्रकरणी मॅजिस्ट्रेट चाैकशी सुरु करण्यात आली होती. त्यानुसार वांद्रेतील महानगर दंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांनी चाैकशी अहवाल तयार केला. तो अहवाल राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केला आहे.
भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना ८४ वर्षीय कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू लोबर न्यूमोनियामुळे (नैसर्गिक) झाला, असा निष्कर्ष चाैकशी अहवालात नमूद केला आहे.