पुण्यातील भेसळयुक्त मिठाईवर FDA ची धडक कारवाई; ४५.७० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम सुरू केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध पेठांमधील मिठाईची दुकाने, घाऊक व्यापारी आणि हॉटेल्स प्रशासनाच्या रडारवर आले असून, या कारवाईमुळे पुणे, सातारा आणि सांगलीतील खाद्यव्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्यातील भेसळयुक्त मिठाईवर FDA ची धडक कारवाई; ४५.७० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त
पुण्यातील भेसळयुक्त मिठाईवर FDA ची धडक कारवाई; ४५.७० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्तPhoto - Canva
Published on

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम सुरू केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध पेठांमधील मिठाईची दुकाने, घाऊक व्यापारी आणि हॉटेल्स प्रशासनाच्या रडारवर आले असून, या कारवाईमुळे पुणे, सातारा आणि सांगलीतील खाद्यव्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

२४ ते २७ जुलैदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, निकृष्ट दर्जा, भेसळ तसेच चुकीच्या लेबलिंगप्रकरणी एकूण ४५ लाख ७० हजार १६७ किमतीचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणे शहरातील पाच नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका कुल्फी उत्पादन केंद्राचा परवाना थेट रद्द करण्यात आला आहे.

सातारा व सांगलीतही कारवाई

ही मोहीम केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही एफडीएच्या पथकांनी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये मिठाई, कँडी, चॉकलेट्स, सुका मेवा, मसाले आणि फरसाण यांसारख्या नित्योपयोगी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर दोषी आढळणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सणासुदीच्या काळात भेसळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उघड्यावर विक्री होणारे किंवा संशयास्पद ठिकाणांवरील खाद्यपदार्थ खरेदी टाळावेत. अन्नामध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in