शीतपेय विकणाऱ्यांवर एफडीएची नजर ; शरीरास अपायकारक, तर परवाना रद्द

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत अशी शरिरास हानिकारक अशी शीतपेय विक्री करणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर
शीतपेय विकणाऱ्यांवर एफडीएची नजर ; शरीरास अपायकारक, तर परवाना रद्द

उन्हाच्या मारा त्यात घामाच्या धारा यातून शरीराला गारवा मिळावा यासाठी आंब्याचा रस, उसाचा रस, कलिंगड ज्यूस अशी विविध शीतपेय घेतो; मात्र ही पेय शरीरास हानिकारक ठरु शकतात. अशा प्रकारची शीतपेय विक्री करणारा स्वच्छ पाण्याचा वापर करतो का, खराब फळांचा वापर करतो का, याचा आपण विचार करत नाही. परंतु मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत अशी शरिरास हानिकारक अशी शीतपेय विक्री करणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर असणार आहे. शरीरास अपायकारक शीतपेय असल्याचे नमुन्यात स्पष्ट झाल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येतो, शरीरास हानिकारक, तर संबंधित दुकानदाराविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येतो, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागांचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

उन्हाळ्यात शीतपेयाच्या मागणीत वाढ होते. प्रत्येकजण गरमीपासून दिलासा मिळावा यासाठी शीतपेयाचा आधार घेत शरीरातील तापमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो; मात्र हाच प्रयत्न आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो.‌ त्यामुळे शरीरास हानिकारक अशा प्रकारे ज्यूस विकणाऱ्यांवर दरवर्षी एप्रिल मे महिन्यात कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. यंदा ही अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहिम हाती घेतली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर विक्री करणाऱ्या शीतपेय विक्रेत्यांकडून विविध पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. यात फळ, साखर, बर्फ आदी पदार्थांचे नमुने घेण्यात येतात. तसेच दुकानात अस्वच्छता आहे, याची ही तपासणी केली जाते. दरम्यान, तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नुमने शरीरास हानिकारक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले, तर रितसर कारवाई करण्यात येते, असे केकरे यांनी सांगितले.

'अशी' होते कारवाई

-परवाना नसेल, तर परवाना घेण्याची सूचना केली जाते

-१ रुपये ते दोन लाखांपर्यंत दंड

-१५ दिवस ते महिनाभरासाठी परवाना रद्द

-तपासणीत शरीरास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले,तर संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जातो

----

शीतपेय टाळा

मुंबईचा पारा वाढत असून, पुढील काही दिवसांत तापमान ४० डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, अतिसार या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. तसे दुपारी १२ ते ४ च्या वेळेत उन्हात जाणे जमल्यास टाळावे. स्वतः काळाजी घेत पिण्याच्या पाण्याची बाॅटल बाळगावी, सतत पाणी पित रहाणे उन्हात जाताना छत्री घेऊन जाणे. विशेष म्हणजे, वाढत्या तापमानात कलिंगड ज्यूस, सफरचंद ज्यूस कुठल्याही प्रकारचे शीतपेय पिणे टाळावे, कारण ज्यूस कशा प्रकारे बनवला याची माहिती आपणांस नसते, त्यामुळे शीतपेय, जंक फूड खाणे टाळावे.

- डॉ. मंगला गोमारे, आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in