कोकण विभागातील ९८ औषध विक्रेत्यांना नोटीस; १९ लाखांचा साठा जप्त

खाद्य व औषध प्रशासन (FDA) विभागाने कोकण विभागात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करणाऱ्या तब्बल ९८ औषध विक्रेत्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून त्यात ठाणे जिल्ह्यातील ५९ विक्रेत्यांचा समावेश आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : राज्यात झेरयुक्त कफ सिरपमुळे झालेल्या दुर्घटनांनंतर औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. खाद्य व औषध प्रशासन (FDA) विभागाने कोकण विभागात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करणाऱ्या तब्बल ९८ औषध विक्रेत्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून त्यात ठाणे जिल्ह्यातील ५९ विक्रेत्यांचा समावेश आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशात झेरयुक्त घटक असलेल्या कफ सिरपचे सेवन केल्याने अनेक मुलांचे मृत्यू झाल्यानंतर राज्यातील FDA विभागाने औषध विक्रीवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यानुसार ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील २१३ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीसाठी ताब्यात घेतलेले ६५ नमुने

एफडीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातून ६५ नमुने तपासणीसाठी घेतले गेले असून १७.७९ लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातून ९ नमुने, रायगड जिल्ह्यातून १२ नमुने (२०,३३५ किमतीचा साठा), रत्नागिरी जिल्ह्यातून १४ नमुने (६१,३४३ किमतीचा साठा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २५ नमुने (१,०४,१२८ किमतीचा साठा) जप्त करण्यात आले आहेत.

एफडीएचा इशारा

एकूण १२५ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एफडीए सूत्रांच्या माहितीनुसार, औषध आणि खाद्य नमुन्यांच्या तपासणी अहवालास दोन ते तीन महिने लागतात; मात्र नियमभंग करणाऱ्यांना यावेळी दंडासह परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई भोगावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in