कर्णपुरा यात्रेत सापडले स्त्री अर्भक

नवरात्राच्या पाच दिवसात शहरात तीन स्त्री अर्भकांना बेवारस टाकून देण्याचे प्रकार घडले
कर्णपुरा यात्रेत सापडले स्त्री अर्भक

छत्रपती संभाजीनगर : आई उदो गं अंबाबाई म्हणत देव्हाऱ्यातील आईची पूजा सुरू असताना प्रत्यक्षातील मातृशक्तीचा मात्र गळा घोटला जात आहे. नवरात्राच्या पाच दिवसात शहरात तीन स्त्री अर्भकांना बेवारस टाकून देण्याचे प्रकार घडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शहराची ग्रामदेवता समजल्या जाणार्या कर्णपुरा देवीच्या यात्रेतच शनिवारी टाकून दिलेले तिसरे स्त्री अर्भक आढळून आले.

पहिली घटना : १७ ऑक्टोबर रोजी साकार शिशूगृह संस्थेच्या बाहेर लावण्यात आलेल्या पाळण्यात अंदाजे अडीच महिने वयाचे स्त्री-जातीचे बाळ सोडून पालकांनी पळ काढला. संस्थेने बाळाला घाटी रुग्णालयात नेवून त्याची तपासणी केली. याप्रकरणी बाळाचा त्याग करणाऱ्या अज्ञात पालकांविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी घटना : १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ वाजता, वाळूज औद्योगिक परिसरातील काही तरूण मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले असता, त्यांना तिसगाव चौका लगत झुडपांमध्ये नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पुढे जावून पाहिले असता अवघ्या एक ते दोन दिवस वयाचे स्त्री-जातीचे अर्भक तेथे आढळले. या प्रकरणातही अज्ञात पालांविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसरी घटना : १९ ऑक्टोबर रोजी सकाळी कर्णपुरा यात्रेतील पंचवटी पोलीस चौकीपाठीमागे बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिथे कपड्यात गुंडाळलेल्या अंदाजे दीड ते दोन महिने वयाचे स्त्री-जातीचे बाळ आढळून आले. छावणी पोलिसांनी या बाळाची घाटी रुग्णालयातून आरोग्य तपासणी करून बाळाला टाकून देणाऱ्या अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल केला.

प्रतिक्रिया

ज्या माता-पित्यांना नवजात अर्भकांचा स्वीकार करायचा नाही, त्यांनी अर्भकांना धोकादायकरित्या झुडपांमध्ये किंवा इतर ठिकाणी फेकून न देता, त्यांना बाल कल्याण समितीकडे आणून द्यावे. अशा पालकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल. अशाप्रकारे बेवारसपुणे बाळांना झुडपात टाकणे त्यांच्या जीवावर बेतू शकते.

-अॅड. आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष बाल कल्याण समिती, छत्रपती संभाजीनगर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in