पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी झालेला भूकंप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोणता कौल देतात याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे.
पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कल्पेश महामूणकर/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी झालेला भूकंप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोणता कौल देतात याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी व धुळ्यात मतदान होणार आहे. या मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात सायंकाळी ६ वाजता संपला. अखेरच्या क्षणी आपल्या मतदारांना साद घालण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये शनिवारी लगबग होती. शेवटच्या दिवशी मुंबई व ठाण्यात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो व रॅली केल्या.

राज्यात पाचव्या टप्प्यातील व अखेरचे मतदान सोमवारी होणार आहे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. महाराष्ट्रातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वढेरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी जोरदार प्रचार केला.

महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रचारात एकमेकांवर जोरदार आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांवर टीकेचा मारा ठेवला, तर भाजपने विकासावर व मतपेढीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले, तर ‘इंडिया’ आघाडीने बेरोजगारी व महागाईवरून सरकारला धारेवर धरले. दोन शकले झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना हा पक्ष निवडणुकीला सामोरा जात आहे. शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उबाठा) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. २०१९ ची निवडणूक शिवसेनेने एकत्रितपणे लढवली होती.

सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी आपण निवडणूक जिंकण्याचा दावा करत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद कमी झाल्याचे दिसते. बारामती या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांची उमेदवारी ही शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यांच्याविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.

मुंबईतील महत्त्वपूर्ण लढती

मुंबईत केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रवींद्र वायकर, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, मिहीर कोटेचा आदी उमेदवार रिंगणात आहेत. ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचा (भाजप) व संजय दिना पाटील (उबाठा), अनिल देसाई (उबाठा), राहुल शेवाळे (शिवसेना, शिंदे गट) यांच्यात दक्षिण-मध्य मुंबई, रवींद्र वायकर (शिवसेना, शिंदे गट), अमोल कीर्तीकर (शिवसेना, ठाकरे गट) यांच्यात उत्तर-पश्चिम मुंबईत लढत होणार आहे.

देशात ४९ जागांवर मतदान

देशात पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार शनिवारी थंडावला. २० मे रोजी ८ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ४९ जागांवर मतदान होणार आहे. यात ६९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, चिराग पासवान आदी दिग्गज आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in