नागपूरच्या दीक्षाभूमीवर पार्किंगवरून राडा; संतप्त आंदोलकांकडून बांधकामाची तोडफोड

नागपूर येथील जगप्रसिद्ध दीक्षाभूमी विकास प्रकल्पातील भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध म्हणून आंबेडकरी जनतेने सोमवारी राडा केला.
नागपूरच्या दीक्षाभूमीवर पार्किंगवरून राडा; संतप्त आंदोलकांकडून बांधकामाची तोडफोड
PTI
Published on

नागपूर : येथील जगप्रसिद्ध दीक्षाभूमी विकास प्रकल्पातील भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध म्हणून आंबेडकरी जनतेने सोमवारी राडा केला. या जनतेने दीक्षाभूमीवर एकत्र येऊन त्यांनी पार्किंगचे काम थांबवले. संतप्त आंदोलकांनी बांधकाम साहित्य आणि बोर्डाची तोडफोड केली तसेच बांधकाम साहित्य पेटवून दिले आहे.

महाराष्ट्र सरकारतर्फे दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगचे काम केले जात आहे. याच पार्किंगच्या कामाला आंबेडकरी जनतेने विरोध केला आहे. दीक्षाभूमीत विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे.

दीक्षाभूमीच्या परिसरात मोठी जागा असून तेथे अनेक अनुयायी येतात. त्या जागेवर सरकार भूमिगत पार्किंग बांधत होते. हे काम करताना दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत जनतेला विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. हे पार्किंग धम्मचक्र प्रवर्तनदिनी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तत्काळ थांबवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले की, या पार्किंगमुळे दीक्षाभूमी वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबवले पाहिजे.

दीक्षाभूमी परिसरात शुभोभिकरण चालू आहे, त्यात काहीही दुमत नाही. पण या परिसरात भूमिगत पार्किंग असू नये. या पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या वास्तूला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे काम थांबवावे, असे लोकांचे मत आहे. वर्षातून दोन ते तीन दिवस या भागात आंबेडकरी समाज येथे येतो. तेव्हा त्यांना या यात्रानिवासात राहण्याची सोय होईल, असे त्यांनी सांगितले.

कामाला दिली स्थगिती

अखेर लोकभावना लक्षात घेऊन या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत बैठक घेऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

logo
marathi.freepressjournal.in