महायुतीत 'फाईल'वॉर! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात फाईलवरून खडाजंगी; मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा जिंकता आल्यामुळे महायुतीतील जवळपास सर्वच पक्ष त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच आता मुख्यमंत्र्यांकडून अजित पवार गटाची कोंडी केली जात आहे.
महायुतीत 'फाईल'वॉर! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात फाईलवरून खडाजंगी; मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
संग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा जिंकता आल्यामुळे महायुतीतील जवळपास सर्वच पक्ष त्यांच्यावर नाराज आहेत. त्यातच आता मुख्यमंत्र्यांकडून अजित पवार गटाची कोंडी केली जात आहे. यावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असतानाच, मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही महत्त्वाच्या फाईल्सवर सह्या करण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महायुतीत सध्या 'फाईल 'वॉर सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

'मविआ' सरकारमध्ये सहभागी असताना अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, अडवणुकीची भूमिका घेतात हे कारण देत शिवसेनेतून फुटून सवतासुभा स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या फाईल्स अडवून ठेवल्याने अजित पवार संतप्त झाल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्याशी पंगा घेऊन 'फाईलवॉर' सुरू केल्याने शिवसेना-अजित पवार यांच्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महायुतीत तिसरा भिडू आल्याने आधीच नाराज झालेल्या शिंदे गटाने आता बाह्या सरसावल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलवर सह्या करण्यावरून मोठा वाद झाला. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यावर राष्ट्रवादीकडून आलेल्या फायलींवरही मी सह्या करणार नाही, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीतच हे शाब्दिकयुद्ध रंगल्याने सत्ताधारी आमदारांमध्ये तणावपूर्व शांतता पसरली होती. एकीकडे शिंदेंचे मंत्री आणि दुसरीकडे अजित पवारांचे मंत्री एकमेकांवर मोठ्या आवाजात आरोप-प्रत्यारोप करत असल्याने हा वाद चांगलाच रंगल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदारांच्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मजबूत फटका बसल्याने कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला घवघवीत यश मिळवायचे, यासाठी शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने चंग बांधला आहे. त्यासाठी नवनवीन योजना आणून विविध घटकांना खूश करण्याचे प्रयत्न सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक फाईल्स मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आल्या आहेत. मात्र अनेक मंत्र्यांच्या विभागाचे काही निर्णय किंवा आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याचे समजते. त्याचबरोबर नगरविकास खात्याच्या काही फाईल्स स्वाक्षरीसाठी अर्थमंत्र्यांकडे आल्या आहेत. मात्र न वाचताच त्यावर सही करणार नाही, अशी ताठर भूमिका अजितदादांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेला अवघे काही महिने शिल्लक असतानाच, महायुतीतही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. येत्या काही आठवड्यांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात अडकवून ठेवण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या फाईलवरही अजितदादा निर्णय घेत नसल्याने त्यांनीही मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबतचा जाब विचारल्याची माहिती समोर येत आहे. अलीकडेच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना जाहीर केल्यानंतर कोणत्याही पद्धतीने या योजनेसाठी पैसे उभे करण्याचे आव्हान अजितदादांनी पेलले आहे. या योजनेसाठी बराचसा पैसा खर्च होणार असल्यामुळे अन्य योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनांची घोषणा होण्याआधी अनेक आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात जाऊनही त्याला मंजुरी मिळाली नसल्याची खदखद राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे.

अनेक योजना राबवण्याचे महायुतीसमोर आव्हान

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून अनेक योजनांची खैरात केली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना, युवकांचे प्रशिक्षण यासारख्या अनेक योजना राबवण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे या योजना यशस्वीपणे राबवण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. या योजना मार्गी लावताना मात्र काही जुन्या योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे.

महायुतीत एकमेकांच्या फाईल्स अडवल्या जातात - रोहित पवार

अजितदादांनी सही केलेल्या फाईलवर देवेंद्र फडणवीस सही करणार, अशी प्रथा पूर्वी नव्हती. अजितदादांनी सही केल्यानंतर फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी जाते. अजितदादांच्या सहीनंतर फाईलवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही लागते. म्हणजे अजितदादांनंतर फाईलवर दोन सह्या होतात. त्यामुळे एकमेकांच्या फाईल अडवून आपली कामे कशी पुढे रेटली जातील, असा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतो. महायुतीत एकमेकांच्या फाईल्स अडवल्या जातात, हे दिसून येत आहे, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in