राज्यसभेसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरे विजयासाठी उत्सुक

राज्यसभेसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल; अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत हंडोरे विजयासाठी उत्सुक

भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण, मेधा कुलकर्णींसह डॉ. गोपछडे यांनी पक्षातील नेतृत्वाचे आभार मानले.
Published on

प्रतिनिधी/मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, तर शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी आपापले अर्ज दाखल केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी यावेळी हजेरी लावली. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज दाखल होताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी उपस्थित होते. दरम्यान, पुण्यातील विश्वास दत्तात्रय जगताप यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. जगताप हे पत्रकार आहेत. मात्र त्यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक यांच्या पुरेशा सह्या नसल्याने छाननीत तो अर्ज बाद होईल, असे समजते.

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. महायुतीच्या पाचही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते हजर होते. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपने चौथा उमेदवार न उभा केल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्टच झाले आहे. मात्र, गुरुवारी अचानक पुण्यातील विश्वास दत्तात्रय जगताप या तरुणाने राज्यसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला. पण त्याच्या अर्जावर एकाही आमदाराची सही नसल्याने तो अवैध ठरवला जाईल.

भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण, मेधा कुलकर्णींसह डॉ. गोपछडे यांनी पक्षातील नेतृत्वाचे आभार मानले. कुलकर्णी म्हणाल्या, पक्षनेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी सार्थ ठरवेन. राज्यसभेची उमेदवारी हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पक्षासाठी इतकी वर्ष काम केल्याचे फळ मिळाले. मला जेव्हा उमेदवारी नाकारण्यात आली तेव्हा काही लोक नाराज होते, पण आता सर्वांची नाराजी दूर होईल. समस्त महिलांचे प्रश्न दिल्लीदरबारी उपस्थित करून ते सोडविण्याचे प्रयत्न करू, असेही कुलकर्णी म्हणाल्या. मिलिंद देवरा यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि देशाची सेवा करण्याची संधी दिल्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांचे आभार व्यक्त करत असल्याचे स्पष्ट केले.

काही गोष्टी गुप्त राहिलेल्या बऱ्या -प्रफुल्ल पटेल

माझी चार वर्षांची टर्म बाकी असताना मी फॉर्म भरला असला तरी त्यात नवीन असे काही नाही. यापूर्वी राज्यात, देशात अशा घटना घडल्या आहेत. त्याबद्दल आजच काही बोलणे योग्य नाही. काही गोष्टी सध्यातरी गुप्तच राहिलेल्या योग्य आहेत. मी अर्ज का भरला, ते आगामी काळात स्पष्ट होईल. मी राज्यसभेचा अर्ज भरण्याचा आणि अपात्रतेचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दाखल याचिकेनुसार आमच्यावरील अपात्रतेचा काहीही विषय नाही. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होत असल्याने माझी रिक्त जागा राष्ट्रवादीकडेच राहील. मी अर्ज दाखल केल्याने कुणावरही अन्याय झालेला नाही. एकमताने माझ्या राज्यसभेच्या उमेदवारीवर निर्णय घेतला आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल पुन्हा सहा वर्षांसाठी राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर पटेल यांच्या जागेसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पोटनिवडणूक अपेक्षित आहे. त्यावेळी अजित पवार यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी न मिळालेल्या किंवा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in