चित्रपटसृष्टीचा 'सम्राट अशोक'!

मराठी चित्रपटसृष्टीत 'मामा' म्हणून ओळखले जाणारे 'अशोक सराफ' आजही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करत आहेत.
चित्रपटसृष्टीचा 'सम्राट अशोक'!

आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या आणि आपल्या विनोदाच्या जबरदस्त टायमिंगने प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील 'अशोक सराफ' या कलाकाराला कोण नाही ओळखत? मराठी चित्रपटसृष्टीत 'मामा' म्हणून ओळखले जाणारे 'अशोक सराफ' आजही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करत आहेत. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तीनही माध्यमांत आपल्या चतुरस्र अभिनयाने ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले कलाकार म्हणजे 'अशोक सराफ'! ब्लॅक ॲण्ड व्हाईट ते डिजिटल सिनेमा असा मोठा टप्पा गाठणाऱ्या अशोक मामांनी मराठी चित्रपटांतील विनोदाला वेगळी ओळख दिली, तर 'अशोक सराफ' यांना मराठी चित्रपटातून 'खरी ओळख' मिळाली. त्यांचे काम पाहून त्यांना सिनेविश्वातील लोक त्यांना 'अशोक सम्राट' म्हणू लागले. वयाची ७५ ओलांडली तरीही 'अशोक सराफ' आजही विविध माध्यमांमधून लोकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

अशोक यांनी पहिल्यांदा लोकप्रिय मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांच्या 'ययाति' पुस्तकावर आधारित नाटकात काम केलं. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकं केली. त्यातून यश मिळायला लागल्यावर त्यांनी त्यांचा मोर्चा सिनेमांकडे वळवला. त्यांना निर्मात्यांकडून सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. अशोक सराफ यांना पहिल्यांदा कॅमेरासमोर उभा राहण्याचा मुहूर्त मिळाला ‘आयलं तुफान दर्याला’ या चित्रपटामुळे. १९७३ साली ‘आयलं तुफान दर्याला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी १९७१ साली ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात 'अशोक सराफ' झळकले होते. अशोक मामांनी सुरुवातीला काही सिनेमात काम केलं. त्यानंतर १९७५ साली आलेल्या 'पांडू हवालदार' या सिनेमातून मामांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मामांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ते मराठी सिनेसृष्टीचा सुपरहिट चेहरा झाले.

मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'करण अर्जुन' सिनेमातील त्यांची भूमिका असो किंवा मग 'सिंघम' सिनेमातील हेडकॉन्स्टेबल असो. त्यांच्या अभिनयाची जादू त्यांनी सर्वत्र पसरवली. ९०च्या दशकात प्रचंड गाजलेली 'हम पांच' मालिका आजही कोणी विसरलेलं नाही.

२५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये केले काम

अशोक सराफ यांनी १९६९ पासूनच चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपट केले, त्यापैकी १०० व्यावसायिक हिट ठरले. त्याने बहुतांशी कॉमेडी सिनेमांमध्येच काम केले आहे. मराठीत त्यांनी बऱ्याच चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. त्यांची जोडी पडद्यावर अनेकदा हिट ठरली. याशिवाय सचिन पिळगावकर यांच्यासोबतचीही त्यांची बॉन्डिंग पडद्यावर अप्रतिम दिसते. हे दोघे खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत.

टीव्ही सीरियलमध्येही मनोरंजन

अशोक सराफ यांनी 'नैना ओ नैना', 'हम पांच', 'ये छोटी बड़ी बातें' यांसारख्या १० टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशोक सराफ यांनी १९९० मध्ये मराठी सिनेसृष्टीच्या प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी लग्न केले. या दोघांच्या वयात १८ वर्षांचा फरक आहे. त्यांना एक मुलगाही आहे. अशोक आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अभिनयक्षेत्रात नाही. त्याने आपल्या आई-वडिलांपेक्षा करिअरचा वेगळा मार्ग स्वीकारला असून, तो बाहेरगावी शेफ म्हणून काम करत आहे.

सगळ्या इंडस्ट्रीचे ‘मामा’

अनेकांना टोपण नावाने ओळखले जाते किंवा काही नावं प्रेमाने मिळतात. अशोक सराफांना पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत मामा या नावाने ओळखले जाते, त्या मागे एक मजेदार किस्सा आहे. ७०च्या काळात कोल्हापूरला एका चित्रपटाचे शूट चालले होते आणि तिथला कॅमेरामन होता ‘प्रकाश शिंदे’. तो त्याच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन शूटिंगला येत असे आणि त्या मुलीला त्याने हा अशोक मामा अशी ओळख करून दिली. थोड्याच दिवसांत सेटवरील सर्वच लोक त्यांना मामा म्हणू लागले आणि हळूहळू हेच नाव त्यांना चिकटले आणि ते संपूर्ण इंडस्ट्रीचे मामा झाले.

मराठी चित्रपट

आयत्या घरात घरोबा, आमच्यासारखे आम्हीच, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, भुताचा भाऊ, माझा पती करोडपती, अशी ही बनवाबनवी, फेका फेकी, एक डाव भुताचा, एक डाव धोबीपछाड, आलटून पालटून, सगळीकडे बोंबाबोंब, साडे माडे तीन, कुंकू घनचक्कर, नवरा माझा नवसाचा चंगु मंगु, अफलातून, वाजवा रे वाजवा, शुभमंगल सावधान, जमलं हो जमलं, गोडीगुलाबी, गडबड घोटाळा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, खुल्लम खुल्ला, धमाल नाम्याची, संसार, कळत नकळत, पैजेचा विडा, बहुरूपी, धूमधडाका, निशाणी डावा अंगठा, झुंज, टोपी वर टोपी.

पुरस्कार

  1. राम राम गंगारामचा पहिला फिल्मफेअर आणि एकूण ५ पुरस्कार

  2. पांडू हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार

  3. सवाई हवालदार या चित्रपटाचा स्क्रीन पुरस्कार

  4. भोजपुरी फिल्म पुरस्कार माईका बिटुआ

  5. मराठी चित्रपटांसाठी १० राज्य सरकारचे पुरस्कार

  6. महाराष्ट्र शासन पुरस्कार

  7. महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार

  8. झी गौरव पुरस्कार

  9. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? मधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

    - संकलन राकेश मोरे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in