अखेर दुचाकीस्वारांवर कारवाईला सुरुवात, मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेट हवेच...

दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड आणि तीन महिने परवाना (लायसन्स) निलंबित करणार
File Photo
File PhotoANI
Published on

मुंबईसह अन्य शहरात दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे; मात्र या नियमांना दुचाकीस्वारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. अद्याप हेल्मेटबाबत गांभीर्य न बाळगल्याने अखेर ९ जूनपासून हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी पहिल्याच दिवशी सहा हजार २७१ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. तर त्याच वेळी दुचाकीस्वारांसह मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड आणि तीन महिने परवाना (लायसन्स) निलंबित करणार असल्याचा अखेरचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

२५ मे रोजी मुंबई वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीबाबत १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली; परंतु अल्टिमेटमची मुदत संपूनही दुचाकीस्वारांकडून नियमांचे कोणतेही पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अखेर मुंबई वाहतूक पोलिसांनी ९ जूनपासून शहरात हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सहा हजार २७१ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये २,३३४ दुचाकी चालक, ३,४२१ पिलियन रायडर्स, दोघांनीही हेल्मेट न घातलेले ५१६ असे मिळून एकूण ६,२७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीची एक पोस्ट मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटरवर टाकली आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सहप्रवाशांच्या हेल्मेट सक्तीला भाजपचा मात्र विरोध आहे.

मुंबईतील हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्यासाठी सुमारे ५० वाहतूक पोलीस चौक्या सतर्क राहतील. गुरुवारपासून हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. तसेच ५०० रुपये दंड भरावा लागेल. सर्व ५० वाहतूक चौक्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

- राजतिलक रोशन, पोलीस उपायुक्त (वाहतूक)

logo
marathi.freepressjournal.in