अखेर तळकोकणात मान्सूनची हजेरी

मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला
 अखेर तळकोकणात मान्सूनची हजेरी
Published on

१० दिवसांपासून महाराष्ट्राच्या सीमेवरून हूल देणारा मान्सून अखेर राज्यात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी तळकोकणात मान्सून दाखल झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. गोव्याची हद्द ओलांडून मोसमी पाऊस दक्षिण कोकणातील वेंगुर्ल्यापर्यंत दाखल झाला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मुंबईतही मान्सून सोमवारनंतर दाखल होईल, असा अंदाज आहे.

मोसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता; मात्र वाऱ्यांचा वेग कमी होऊन मोसमी पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. ३१ मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मोसमी पाऊस पोहोचला. त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नव्हती. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता; मात्र प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, लवकरच मोसमी पावसाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश होईल, असे हवामान विभागाने गुरुवारी (९ जून) जाहीर केले होते. त्यानुसार हा प्रवेश झाला आहे.

समुद्रातून येणाऱ्या बाष्यामुळे सध्या महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांतही पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. मोसमी पावसाने कर्नाटकचा बहुतांशी भाग व्यापून गोव्यात प्रवेश केला. त्यानंतर तो दक्षिण कोकणाची वेस ओलांडून वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला आहे.

logo
marathi.freepressjournal.in