नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात फायनान्स कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात ; सुमारे पाच तास चालली चौकशी

नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत १५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात फायनान्स कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात ; सुमारे पाच तास चालली चौकशी

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओत गळपास लावून आत्महत्या केली. त्यांना आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. यानंतर त्यांच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत पाचही आरोपींना आज सकाळी दहा वाजता रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. यावेळी हे पाचही आरोपी आपल्या वकिलांसह जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

यावेळी नितीन देसाईंचे काका देखील पोलीस ठाण्यात हजर होते. यावेळी या आरोपींची सकाळी ११ वाजेपासून सुरु झालेली चौकशी सुमारे ५ तास चालली. देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर खालापूर पोलिसांकडून संबंधित फायनान्स कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज पोलीस स्टेशनला हजेरी लावली. पोलीस एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार व अकाउंटंट यांच्याकडून कर्ज प्रकरणातील माहिती घेत आहेत. या गुन्हासंदर्भात आतापर्यंत १५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

देसाई यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा खालापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. फायनांस कंपनीचे रशेष शहा, केयुर मेहता, स्मित शहा, ईएआरसी कंपनीचे आर. के. बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कंपनीने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in