महाराष्ट्र
गॅस गळतीमुळे आग; दोन जण जखमी
भाज्या गरम करण्यासाठी ठेवलेली सामग्री, गॅस शेगडी यासह सर्व सामान जळून खाक झाले. स्फोटात दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले.
नाशिक : शहरातील इंदिरानगर भागात गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सकाळी शुभेच्छांची देवाण घेवाण सुरू असतांना इंदिरानगरमधील कलानगर परिसरातील वक्रतुंड पार्सल पॉइंट येथे गॅस गळतीमुळे आग लागली. पार्सल पॉइंट या ठिकाणी सुरेश लहामगे (६०) आणि संदीप कांडेकर हे सोमवारी नेहमीप्रमाणे कामावर आले. दुकान उघडले असता अंधार असल्याने त्यांनी दिवे लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गॅस गळतीमुळे कोंडलेला वायू मोकळा झाला. शाॅर्ट सर्किट होऊन गॅसचा भडका उडाला. त्यात भाज्या गरम करण्यासाठी ठेवलेली सामग्री, गॅस शेगडी यासह सर्व सामान जळून खाक झाले. स्फोटात दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले.