
जळगाव : जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील सिद्धिविनायक या प्लास्टिक चटई तयार करणाऱ्या कंपनीला रविवारी रात्री अकरा वाजता भीषण आग लागली. यावेळी कंपनीत तयार झालेल्या मालासह कच्चामाल व अन्य साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत पहाटे पाच वाजता ही भीषण आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देत घटनेची माहिती घेतली.
येथील औद्योगिक वसाहतीत डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक ही प्लास्टिक चटई तयार करणारी कंपनी आहे. कंपनीत नियमित उत्पादन सुरू असताना रविवारी रात्री अकरा वाजता अचानक आग लागली. ही बाब कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कंपनीबाहेर धाव घेतली. प्लास्टिकमुळे काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. कारखान्यात तयार झालेला माल, कच्चा माल आगीत जळून खाक झाला.
क्रेनद्वारे कंपनीच्या भिंती पाडून आत केला प्रवेश
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, जामनेर नगरपालिका, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, क्रेनद्वारे कंपनीच्या दोन्ही बाजूंच्या भिंती पाडून आत असलेला कच्चा माल, चटई निर्मितीसाठी लागणारे ग्रॅन्युअल्स यांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पहाटे पाच वाजता आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.