
काल पुण्यामध्ये शिवशाही बसला आग लागली होती. ही घटना ताजी असतानाच आज नाशिक - पुणे महामार्गावर चालत्या शिवनेरी बसने पेट घेतला. यानंतर आता एसटी महामंडळाच्या वाहनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अवघ्या २४ तासात झालेल्या या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरीही बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
प्रवाश्यांनी भरलेली शिवनेरी बस ही नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. चालत्या गाडीतून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला घेतली. बसमधील प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवले. बघता बघता बसला भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कोनतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आणि प्रचंड वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले.